ARTHSANSKAR – तुम्हाला पैशाविषयी काय वाटते ?

आपला पैशाविषयी असलेला दृष्टीकोन हा आपल्या Financial life चा पाया आहे. प्रत्येक माणूस जसा वेगळा असतो त्याप्रमाणे त्याचा पैशाविषयीचा दृष्टीकोनही वेगळा असतो. त्यामध्ये बरोबर किंवा चूक काहीच नसते पण तो वेगळा असू शकतो हे मान्य करणे महत्त्वाचे.

पैशाविषयीचे कुठलेही प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे हा दृष्टीकोन घडत जातो; आपल्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडीमुळे. यात सर्वात जास्त प्रभाव असतो तो आई-वडिलांचा नंतर शाळा, शिक्षक, मित्रमंडळी यांचा. लहानपणापासून या सर्वांची पैशाविषयी असलेली मतं आपले मत ठरवण्यावर प्रभाव टाकतात.

पैसा हेच होणाऱ्या सर्व वाईट गोष्टींचे कारण आहे, इथपासून पैसा हेच सर्वस्व आहे अशा प्रकारची मते बनतात. हा दृष्टीकोन जो असतो त्यावर आपल्या आयुष्याचे अनेक निर्णय अवलंबून असतात. नोकरी/धंदा आपले Career, नवरा/बायको/मूल/आईवडील/इतर नातेवाईक यांच्याशी असलेले संबंध, खर्च करणे, वस्तू विकत घेणे, फिरायला जाणे यासारखे सर्व महत्त्वाचे निर्णय घेताना पैशाविषयी दृष्टीकोन खूप महत्त्वाचा असतो.

बऱ्याचदा आपण वरवरची मलमपट्टी करत राहतो पण मूळ आपला पैशाविषयीचा दृष्टीकोनच योग्य नसेल तर कोणत्याही उपाय योजनांनी फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्या गतआयुष्याकडे नजर टाकून आपला पैशाविषयीचा दृष्टीकोन काय आहे हे समजणे गरजेचे आहे.

सर्वसामान्यपणे पैशाची ताकद बरेचजण जाणतात. ज्या ज्या वस्तूंमुळे आनंद मिळेल असे मनुष्याला वाटते त्या त्या वस्तू घेण्यासाठी पैशांची गरज ही लागतेच. त्यामुळे भरपूर पैसा आपल्याकडे असेल तर जास्तीत जास्त गरजा आपण भागवू शकतो हा सर्वसामान्य विचार. सध्याच्या काळात संतांचे प्रमाण नगण्यच, त्यामुळे जास्त पैसा म्हणजे जास्त सुख, आनंद मानणारे जास्त आणि त्यामुळे त्याच्या मागे धावणारे जास्त.

गंमत अशी असते की हा प्रचंड पैसा कमी लोकांकडे असतो मग बरेच लोक हाच पैसा हे सर्व वाईट प्रवृत्तींचे कारण आहे, एकमेकातील संबंध कमी होण्याचे कारण आहे असा विचार करतात. त्यामुळे पैसा हेच सर्वस्व ते पैसा सर्व Problems चे मूळ असा दृष्टीकोन दिसतो.

माझ्यामते जगातला सर्वात योग्य Guide म्हणजे श्रीकृष्ण, त्याने सांगितलेला समत्व योग हाच खरा योग. मध्यम मार्ग किंवा संतुलन म्हणजे कोणतीही टोकाची भूमिका न घेता काढलेला मार्ग योग्य मार्ग.

पैशाची ताकद मान्य केलीच पाहिजे. आजच्या जगात पैशाशिवाय जगणे मुश्कील होईल. शिवाय एखाद्या गोष्टीचे खरे मूल्य जाणून घेण्यासाठी पैसा हे मानदंड आहे. लोकांना पैसे खर्च करायला आवडत नाहीत जर लोक पैसे देऊन एखादी गोष्ट विकत घेत आहेत म्हणजे लोकांच्या दृष्टीने त्याचे मूल्य जास्त आहे. त्यामुळे अशा पैशाशी आपण शत्रुत्व घेऊच शकत नाही.

पण पैशाच्या ताकदीला पण मर्यादा आहेत मला Master कार्ड ची जाहिरात आठवते. ‘There are some things which money can not buy and for others use Master Card.’ अत्यंत समर्पक जाहिरात होती.

चिरंतन आनंद, समाधान, मैत्री, निखळ नाते संबंध पैसा विकत घेऊ शकत नाही. हे समजणे, जाणणे गरजेचे आहे.

वेळात वेळ काढून बघितले पाहिजे की आपला पैशाविषयीचा दृष्टीकोन कुठल्या एका टोकाच्या जवळ नाही ना ? शेवटी यात चूक आणि बरोबर काही नाही. आपले निर्णय हे आपल्या दृष्टीकोनाप्रमाणे असतात आणि मग त्या निर्णयांची जी फळे असतात त्याची जबाबदारी पण आपलीच असते.

एक प्रसंग सांगून लेख संपवतो. Tiecon च्या समारंभाला thyrocare चे founder, Dr. Velumani उपस्थित होते. एक तासाचे त्यांचे जोरदार भाषण झाले. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. त्यानंतर प्रश्नोत्तरेही रंगली होती. त्या ओघात ते म्हणाले की काहीशे कोटींची उलाढाल असून त्यांचा महिन्याचा खर्च ५००००/- रू. च्या आत असतो. ह्यावर एका businessman ने प्रश्न विचारला एवढे काम करून एवढ्या अडचणींना सामोरे जाऊन एवढे कष्ट करायचे आणि ५०००० रू. खर्चात राहायचे तर एवढे कष्ट का करायचे? सभागृहात एकदम शांतता पसरली आता उत्तर काय देणार? त्यांनी दोन शब्दातच उत्तर दिले ‘नका करू कष्ट’ कोणी सांगितले नाहीये. मला कोणी सांगितले म्हणून मी कष्ट करत नाही, किती पैसे मिळणार, खर्च करणार म्हणून कष्ट करत नाही मी कष्ट करतो मला मिळणाऱ्या आनंदासाठी. टाळ्यांचा कडकडाट.

त्यामुळे कोणी कशासाठी, किती काय करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपला पैशाविषयीचा दृष्टीकोन निकोप, निरोगी आहेना हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे.

पैशाशी शत्रूत्व नको, पैशाचे मांडलीकत्व नको आपण पैशाशी मैत्री करूया आणि या मैत्रीतून खऱ्या स्वातंत्र्याकडे जाऊ. Friendship with finance for freedom हे अर्थसंस्काराचे ब्रीदवाक्य असणार आहे.

In case you have any doubts, need any clarification, you can reach me at atul.bhide@dynamicremedies.in

AtulBhide

About Author: Mr Atul Bhide is a Chartered & Cost Accountant by education. He is one of the founders of Vaidya Sane Ayurved Laboratories that runs chain of Madhavbaug Ayurvedic Cardiac Care Clinics. Currently he is director of Dynamic Remdies, an entity engaged into manufacture, sale of ayurvedic medicines. He is passionate about meditation, lifestyle modification and investments. He is also Certified Wellness Coach and Master Spirit Life Coach.