बऱ्याच वर्षांपूर्वी, कुठल्यातरी boxer चे वाक्य वाचले होते, “Fight is not lost when you are knocked down, fight is lost when you don’t get up”.

या वाक्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा अनेक कारणांमुळे आपण knocked down असतो. पण पुन्हा उभे राहून खेळ चालू ठेवणे महत्वाचे असते.

अशी परिस्थिती माझ्यावरही अनेकदा येत असते. पण आता आठवण्याचे कारण म्हणजे मागच्या म्हणजे तीन महिन्यापूर्वी मी लिहिलेला blog.

त्या blog मध्ये ८८ दिवस न चुकता Meditation Practice चालू ठेवण्याबद्द्ल मी स्वतःचे खूप कौतुक केले होते. पुढे जवळ जवळ आणखी महिना न चुकता Practice चालू होती. ४/५ दिवस गावाला गेलो आणि Practice मध्ये खंड पडला. पण मला खात्री होती की आपण सलग ४ महिने Practice केली आहे तर खंड पडला तरी लगेच पुन्हा चालू करू.

परत आल्यावर नेहमीप्रमाणे ४/५ दिवस सतत बाहेरचे खाऊन जे होते ते झाले. थोडे पोट बिघडले, तोंड आले इ. मग तर काय अजून कारण मिळाले. खंड चालूच. नकारात्मक विचार तर काय पाचवीलाच पुजलेले असतात. “काय उपयोग ४ महिन्याच्या Practice चा?”. ”सातत्य राहात नाही कसे?” “कुठे उपयोग होतोय Meditation चा ? पोट बिघडलेच, तोंड आलेच, डोकं दुखतच आहे” अशा विचारांची गर्दी वाढली. हा खंड १०/१२ दिवसांवर गेला. मला वाटते की genius आणि ordinary लोकांमध्ये एक फरक असतो तो म्हणजे सातत्य. Genius लोकांनाही कंटाळा येत असणार, नकारात्मक विचार येत असणार पण त्यांच्या सरावात खंड पडत नसणार. म्हणूनच सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन थोडेच असतात.

३ महिन्यांच्या सातत्यपूर्ण सरावानंतर मी ९ आठवड्यांचा एक Workshop सुरू केला होता. ज्यात Lifestyle diseases नी त्रासलेल्या काही Patient ना घेऊन ९ आठवडे दर रविवारी २ तास ध्यानाचा सराव करायचा आणि उरलेले दिवस Patient नी आपला आपण सराव करायचा आणि स्वतःमध्ये होणारा बदल अनुभवायचा असा प्रयोग.

या workshop मध्ये सामील झालेल्या लोकांचे रविवारचे दोन तास चांगले जायचे पण नंतर करायच्या Practice मध्ये सातत्य नसायचे. मला ते आवडत नसे. आधीच असलेल्या नकारार्थी विचारात ही अजून एक भर. अशाच स्थितीत रविवारचा एक session मी घेतला. आणि त्याचा मला खूप त्रास झाला.

मला असं वाटते की प्रत्येकाने एखाद / दोन तत्व अशी पाळली पाहिजेत की ज्याच्या आधारे आपण महत्त्वाचे निर्णय घेऊ शकू. “Walk the talk” हे माझ्यासाठी असलेल खूप महत्वाचे तत्व. जगाला सांगायचे लवकर उठ आणि आपण सकाळी ८/९ वाजेपर्यंत झोपून राहायचे किंवा वेळेवर जेवा सांगायचे आणि आपण दुपारी २.३०/३ किंवा रात्री १०/१०.३० नंतर जेवायचे हे मला जमूच शकत नाही. Self fitness हे असेच आणि एक तत्व. शरीराची, मनाची काळजी घ्यायला मला खूप आवडते. त्यासाठी लागणारे कष्टही मी घेत असतो. या दोन तत्वांमुळे लक्षात आले की आपण चुकतोय, घसरतोय. आणि त्या boxer च्या वाक्याप्रमाणे knock down स्थितीत राहून चालणार नाही उठायलाच हवे, match व्यवस्थित खेळायलाच हवी. आणखी एक गोष्ट लक्षात आली की, आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा हव्यात की ज्या आपल्याला फक्त बरोबर असणे किंवा त्यांनी अगदी कमी शब्दात काही गोष्टी सांगणे गरजेचे असते.

डॉ.यश वेलणकर आणि माझी बायको डॉ.मधुरा हे काम माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे करतात. मी डॉ. वेलणकरना नेहमी म्हणतो की माझ्यासारखेच सर्व विद्यार्थी मंद आणि slow learner असतील तर तुमचे कठीण आहे. ते पण नेहमी सांगतात की अरे खूप लोकांना mindfullness चा उपयोग लवकर होतो. जेवढा problem मोठा तेवढा उपयोग लवकर. आणि सहज जाणवण्याजोगा. त्यामुळे तुझे problem किरकोळ आहेत. त्यामुळे तुला बदल जाणवत नाही. खूप छोटे, छोटे बदल होत असतात आणि ते जाणणे त्याबद्दल स्वतःचे कौतुक करून घेणे गरजेचे असते. त्यासाठी सुद्धा practice ची गरज आहे.

त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विचार केला की स्वतः मध्ये होणारे बारीक, बारीक बदल लक्षात यायला लागतात. कुठले बरे हे बदल?

माझी  स्वतःची जागरुकता वाढल्याची जाणवते. विचार, भावना यापासून स्वतःला वेगळे करून त्याकडे पाहण्याची शक्ती थोड्या प्रमाणात का होईना वाढल्याचे जाणवते. अनेकदा प्रतिक्रिया देताना किंवा कधी कधी देण्यापूर्वीही जाणवते. Stephen Covey म्हणतो त्याप्रमाणे stimulus आणि response यामध्ये gap जाणवते. अगदी लहानशी का होईना पण ती जाणवते. सगळ्यात फरक जाणवतो ते ऐकण्याच्या क्रियेमध्ये. लक्षात येते की बऱ्याचदा आपण समोरच्याचे पूर्ण ऐकत नाही आणि आपल्या मनात त्याला उत्तर काय द्यायचे याचा विचार करतो. मी स्वतःला अनेक वेळा असे करताना पकडतो आणि पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करतो.

क्षणोक्षणी आपण इतरांना कसे judge करत असतो तेही जाणवते. त्यातला व्यर्थ पणा जाणवतो. घरातील वादविवाद भांडणे थांबली का? तर नाही. पण त्याची तीव्रता (intensity) वारंवारता (frequency) आणि अवधी (duration) नक्की कमी झाले. संवाद सुधारला, विशेषतः १८ वर्षाच्या मुला बरोबरचा तर नक्की.

नकारात्मक विचार यायचे बंद झाले का तर अजिबात नाही. नकारात्मक विचारांच्या लाटा येतच असतात कधी कधी त्या खूप मोठ्याही असतात. पण कुठेतरी लक्षात येते की त्या लाटा आहेत, ओझरणार आहेत. मनाची आंदोलने सुद्धा लक्षात येतात आणि त्यामुळे या लाटात वाहून जायला होत नाही.

अनेकदा मला अस्वस्थ वाटते, चालू असलेल्या सगळ्या गोष्टीच्या व्यर्थतेने निराशा वाटते. कशासाठी हे सर्व असे वाटते. या विचारांच्या विचारांनी अजून भीती वाटते.

तुम्हाला असे कधी वाटते का? अस्वस्थता जाणवते का? आजूबाजूला बघताना मला असे वाटत नाही. सर्वजण मजेत आहेत असे वाटते. What’s app वरील ज्ञानामृत पिऊन सर्व लोक सुखी आहेत असे वाटते. Facebook

post वरील feeling excited, great असे लिहिलेले विविध ठिकाणचे photo पहिले कि वाटते की आपण एकटेच असे नकारात्मक /आजारी आहोत का?

का हे सगळे पांघरलेले बुरखे आहेत? आपण काही न करता ५ मिनिट पण बसू शकत नाही आपल्याला सतत काहीतरी करायचे असते. ५ मिनिटे जरी मोकळी मिळाली तरी आपण what’s app चे Messages पाहतो, facebook post पाहतो, mobile नसेल तर वर्तमानपत्र वाचतो, TV बघतो, Mall मध्ये जातो, Cinema बघतो. आपण स्वतःच्या विचारांना, तणावाला, अस्वस्थतेला, नकारात्मकतेला सामोरे जातच नाही. या सतत काहीतरी ‘करण्याच्या’ दुनियेत स्वतःला लपवू पाहतो.

किती दिवस पळणार यापासून? कधीतरी ही अस्वस्थता, नकारात्मकता कुठल्यातरी आजाराच्या रूपात बाहेर पडते. तरीसुद्धा आपण त्याला सामोरे जातो का ? तर नाही, आपल्याला वाटते औषधे आहेत, डॉक्टर आहेत. औषधे घेऊन आजार बरे होतील. बाहेरून कोणीतरी येईल, काहीतरी होईल आणि मग आपण मजेत आयुष्य घालवू या अपेक्षेत आपण आपले आयुष्य घालवतो.

माझ्यामते Meditation हे स्वतः स्वतःवर रोज केलेले operation आहे. ज्यामध्ये आपण आपल्या शरीराला/मनाला त्याच्या सर्व गुणदोषासकट, वासनांसंकट स्वीकारायला शिकतो. माझ्या मते हेच खरे औषध आहे आणि म्हणूनच गौतम बुद्ध म्हणतात ते पटते की awareness is the only medicine.

एखादी गोष्ट आपल्याला पटली, आवडली की ती आपल्या जवळच्या, महत्वाच्या लोकांना पण सांगावी असे वाटते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या group मध्ये, office मध्ये या विषयी अधिक माहिती करून घ्यायची असेल तर मला तुमच्याशी भेटायला, बोलायला, सांगायला जरूर आवडेल.

संपर्क : ९८२२०५७३८८/८३८००१६११९

Email : atulbhide09@gmail.com